शेतकरी मेळावा व भोसेखिंड प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

कर्जत, दि. २६ (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकर्‍यांच्या दयनीय अवस्थेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेच जबाबदार असून, कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाला उखडून टाकण्याची भाषा करणार्‍या अजित पवार यांना ‘तुमच्या काकांना जे जमले नाही ते तुम्हाला जमेल का?’ असा सवाल करत आपला पुणे जिल्हाच सांभाळा, असा सल्ला देत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवार काका-पुतण्यांवर जोरदार टीका केली. तालुक्यातील माहिजळगाव येथे शनिवारी भाजप-शिवसेना-रिपाइंतर्फे शेतकरी मेळावा व भोसेखिंड प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; त्याप्रसंगी खा. मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे हे होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष ऍड. कैलास शेवाळे यांनी भोसे खिंडीतून सीना नदीत जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी घोषणा १४ वर्षांपूर्वी केली होती. अखेर पाणी आले. आज भोसेखिंड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व ऍड. शेवाळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. खा. मुंडे म्हणाले, की ऍड. शेवाळे यांनी गेली १४ वर्षे अनवाणी हे व्रत जपले यातून जनतेवर आणि कामांवर निष्ठा असल्याचे प्रतीत होते. भोसे खिंडीला युती शासनानेच मंजुरी दिली होती अन् पैसे मी दिले होते. आता पुन्हा मुंडेचे सरकार येईल व मीच या चारीतून बीड जिल्ह्यामध्ये पाणी नेणार. आपण आमचा एक आमदार पळवला, पण आपल्याला पाणी देता आले नाही, असे म्हणत बीडच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी मुंडेंनी शरद पवारांसह अजित पवार, मुख्यमंत्री, पाचपुते यांच्यावर टीका केली. पाणी देण्यासंदर्भात भेदभाव केला तर आम्ही खपवून घेणार नाही. तुमची दंडेलशाही चालणार नाही, असा इशारा देतानाच जिल्हाध्यक्ष आ. राम शिंदे यांना यशस्वी अध्यक्ष होण्यासाठी शुभेच्छा देताना यशस्वी अध्यक्ष व्हायचे असेल तर खा. दिलीप गांधींचा सल्ला घ्या, प्रताप ढाकणेंचा सल्ला घ्या, काही अडचण आली तर आ. शिवाजी कर्डिलेंची मदत घ्या व तरीही अडचण सुटली नाही तर झरेकरसारख्या ज्येष्ठांचेही मार्गदर्शन घेत चला, असा सल्ला देऊन जिल्ह्यातील भाजपांतर्गत सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश दिला. खा. दिलीप गांधी यांनी १४ वर्षांपूर्वीच्या शेतकरी मेळाव्याचा अनुभव सांगून त्यावेळी पाचपुते म्हणायचे, ‘उसाचे पाणी कुसळाला द्यायचे काय?’ तेच पाचपुते आज आपल्या वाढदिवशी पाणी सोडतायत. या चारीचे दार कोठे व पाणी बाहेर येते कोठे हे तरी त्यांना माहिती आहे काय? असा सवाल केला. आ. राम शिंदे यांनी आघाडी सरकार टेंडर घोटाळा, आदर्श घोटाळ्यात अडकले असल्याची टीका केली. भोसे खिंडीचे काम पूर्ण झाले असले तरी युती शासनाच्या काळात तुकाई चारीचा प्रस्ताव केला आहे; तो अद्याप मंजूर नसून, कोंभळी परिसरातील ८ ते १० गावे या योजनेतून वंचित असल्याचे सत्कारमूर्ती ऍड. शेवाळे म्हणाले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी, ‘खैरलांजी प्रकरणात दलित महिलेवर बलात्कार केला गेला, मोठे हत्याकांड झाले; तेव्हा हे निषेध करणारे राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते झोपले होते काय? असा प्रश्‍न करत रिपाइं भाजप-शिवसेनेशी मैत्री टिकवणार असून, ती कशी निभवायची हे आम्हाला चांगले माहिती असल्याचे म्हटले. यावेळी हरिदास केदारे, डॉ. रमेश झरकर, गणेश मदने, सूर्यकांत मोरे, ऍड. बापूराव चव्हाण, राजेंद्र म्हस्के, विक्रम तांबे आदिंची भाषणे झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते ऍड. कैलास शेवाळे यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या शेतकरी मेळाव्यात कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव राऊत यांनी भाजपात प्रवेश केला. कार्यक्रमास आ. शिवाजीराव कर्डिले, प्रतापराव ढाकणे, वसंत लोढा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, चंद्रशेखर कदम, सुनील रामदासी, नामदेवराव राऊत, स्वप्निल देसाई, शांतिलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, श्रीकांत साठे, राम शेटे, श्रीमंत शेळके, सुखदेव लष्करे, प्रसाद ढोकरीकर, माहिचे सरपंच प्रकाश कदम, अनिल मोहिते, पाटेवाडीचे सरपंच मोहनराव डिसलेआदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश दिवटे व बिभीषण खोसे यांनी केले, तर आभार ऍड. बापूराव चव्हाण यांनी मानले.